देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून खासदार म्हणून सर्वाधिक वाटा हा मराठा समाजाला मिळाला आहे का याविषयी सविस्तर पाहिले तर असे दिसून येते की, राज्याचा भारताच्या लोकसभेमध्ये ४८ जागांचा वाट आहे त्यामध्ये जर ही ४८ खासदारांची यादी तपासली तर तब्बल २६ मराठा खासदारांची वर्णी ही संसदेमध्ये लागलेली आहे. तर फक्त आणि फक्त ९ खासदार हे ओबीसी समाजातील आहेत.६ खासदार अनुसूचित जातीचे, ४ खासदार अनुसूचित जमातीचे तर तीन खासदार हे खुल्या प्रवर्गातील असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.
वरील आकडेवारीला कारणीभूत असलेले राज्यातील गेल्या काही महिन्यातील राजकीय घडामोडी, मराठा आरक्षणासाठी झालेले आंदोलन, या आंदोलनामुळे मराठा मताचे झालेले ध्रुवीकरण याचा हा परिणाम लोकसभा निवडणुकीवर झाला आहे का? असा प्रश्न उपस्थित होणे स्वभाविक आहे.
या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र,मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात मराठ्यांचे वर्चस्व दिसून आले आहे. याबाबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाने ही बाब दुर्दैवी असल्याचे सांगत महाराष्ट्रात सुरुवातीपासूनच राजकारणात मराठ्यांचे वर्चस्व राहिले असून ते कायमच राहिल्याचे मत व्यक्त केले आहे.
आज महाराष्ट्रात ४८ पैकी १२ ते १३ खासदार हे ओबीसी आहेत. मात्र त्यापैकी काहीजण ओबीसी असून सुद्धा ते राजकारणासाठी स्वतःला ओबीसी म्हणून घेत नाहीत. ती लोकांसमोर जाताना स्वतःला मराठा म्हणूनच जातात. हे आमचे दुर्दैव असल्याचे ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी म्हटले आहे.
याचबरोबर तायवाडे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन झाले त्याचा परिणाम ही लोकसभा निवडणुकीवर झाला आहे, या आंदोलनामुळेच ओबीसी हा संपूर्ण महाराष्ट्रभर एक वाटला गेला आहे. त्यामुळेच विदर्भ आणि कोकणात ओबीसी खासदार निवडून आले आहेत असे म्हटले आहे.
महाराष्ट्र मध्ये निवडून आलेल्या जातीनिहाय खासदारांची यादी
१. मराठा खासदार महाविकास आघाडी
शाहू छत्रपती, डॉ. शोभा बच्छाव, विशाल पाटील, सुप्रिया सुळे, धैर्यशील मोहिते, संजय देशमुख, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे, निलेश लंके, ओमप्रकाश निंबाळकर, डॉ कल्याण काळे, वसंत चव्हाण, नागेश आष्टीकर, संजय जाधव, बजरंग सोनवणे.
२. मराठा खासदार महायुती
स्मिता वाघ, नारायण राणे, श्रीकांत शिंदे, उदयनराजे भोसले, नरेश म्हस्के, मुरलीधर मोहोळ, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, प्रतापराव जाधव, संदिपान भुमरे, अनुप धोत्रे.
३. ओबीसी खासदार महाविकास आघाडी
प्रतिभा धानोरकर, डॉ. अमोल कोल्हे, डॉ. प्रशांत पडोळे, अमर काळे, संजय दिना पाटील, सुरेश बाळ्या मामा म्हात्रे.
४. ओबीसी खासदार महायुती
रक्षा खडसे, सुनील तटकरे, रवींद्र वायकर.
५. एससी खासदार
बळवंत वानखेडे, भाऊसाहेब वाकचौरे, प्रणिती शिंदे, वर्ष गायकवाड, श्याम कुमार बर्वे, डॉ शिवाजी काळगे.
६. एसटी खासदार
भास्कर भगरे, डॉ. हेमंत सावरा, डॉ. नामदेव कीरसान, गोपाल पाडवी.
७. खुल्या वर्गातील खासदार
नितीन गडकरी, पियुष गोयल, अनिल देसाई.