कुटुंबाच्या एकीतून दुग्ध व्यवसाय केला यशस्वी, आता कमावतात रोज 100 म्हैशींपासून 50 हजार रुपये.

कुटुंबाच्या एकीतून दुग्ध व्यवसाय केला यशस्वी Dairy Farming : मुरगूड (जि. कोल्हापूर) येथील कृष्णात मसवेकर यांनी बांधकाम व्यवसायाशी संबंधित व्यवसाय सांभाळून सुमारे शंभर जनावरांची संख्या असलेला दुग्ध व्यवसाय फायदेशीर केला आहे. कुटुंबाची एकी, सर्वांचे श्रम, चोख व्यवस्थापन यामुळे हे यश मिळवणे त्यांना शक्य झाले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूड (ता. कागल) येथील कृष्णात मसवेकर यांची साडेतीन एकर शेती आहे. यात दोन एकर ऊस व उर्वरित क्षेत्रावर गवतवर्गीय चारा पिकासाठी ठेवले आहे. याशिवाय अन्य शेतकऱ्यांकडील दोन एकर क्षेत्रही चाऱ्‍यासाठी करारावर घेतले आहे.

शेतीबरोबर बांधकाम व्यवसायाशी संबंधित व्यवसायही मसवेकर करतात. त्यातील उत्पन्न दुग्ध व्यवसायाच्या विस्तारासाठीच वापरले. सन २०१८ मध्ये केवळ एका म्हशीपासून सुरी झालेला गोठा आता शंभरहून अधिक जनावरांपर्यंत पोहोचला आहे. अर्थात, कुटुंबातील एकी हा त्यातील महत्त्वाचा भाग ठरला आहे.

गोठा व्यवस्थापन कसे केले ?

सव्वा एकर जागेत एकूण क्षेत्र तर सात गुंठे क्षेत्रात गोठ्याचे बांधकाम आहे. मुक्त व बंदिस्त गोठा, वासरांसाठी स्वतंत्र जागा तसेच शेण, चारा यांच्यासाठी वेगळी व्‍यवस्‍था करण्यात आली आहे. एका ओळीत सोळा म्हशी अशा पाच ओळींमध्ये म्हशी बांधल्‍या जातात. भाकड म्हशींना मुक्त गोठ्यात ठेवले जाते. एकूण जनावरांपैकी ७५ म्हशी आहेत. एचएफ जातीच्या १० गायी व २५ वासरे आहेत. गोठा व्‍यवसायातून फायदा होईल तशी टप्प्याटप्प्याने जनावरांची संख्या वाढू लागली. कोरोना काळात आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्याने काही काळ नियोजन विस्कटले. पण अथक परिश्रमातून गाडी पुन्हा गाडी रुळावर आणली. हरियाना, गुजरात येथून जातिवंत मुऱ्हा जातीच्या म्हशी आणल्या आहेत. गोठ्यातच अधिकाधिक जनावरांची पैदास व्हावी असा प्रयत्न असतो. त्यासाठी कृत्रिम रेतन तंत्रज्ञानाचा आधार घेतला जातो.

कुटुंब राबते व्यवसायात पहाटे लवकर गोठ्याचे कामकाज सुरू होते. सकाळच्या सत्रातील बहुतांश कामे दहा वाजेपर्यंत आटोपतात. यामध्ये जनावरांची स्वच्‍छता करणे, धारा काढणे, चारा व खाद्याचे नियोजन करणे आदी कामांचा समावेश असतो. चार कामगार तैनात केले आहेत. त्यांच्या बरोबरीने स्वतः कृष्णात, पत्‍नी स्वाती, भाऊ रंगराव, त्यांची पत्नी माधुरी असे घरातील सर्व सदस्‍य काम करतात. यानंतर दोघे भाऊ आपल्या दुसऱ्या व्यवसायासाठी निघून जातात. सायंकाळच्या सत्रात गोठा व्यवस्थापनाची जबाबदारी मजुरांसह महिला सदस्यांवर असते.

सायंकाळी आठ वाजेपर्यंत ही कामे पूर्ण होतात. चार एकर क्षेत्रातून चारा दररोज उपलब्ध केला जातो. बाहेरून ऊस, मका आदींचीही उपलब्धता केली जाते. कडबा कुट्टी, गव्हाचा कोंडा आदी खाद्याचा वर्षाला ५० टनांपर्यंत साठा केला जातो. ला जातो. सरकी पेंड, भुसा, मका पीठ, गोळी पेंड आदींचे मिश्रण देण्यात येते. गायीच्या दुधाची विक्री केली जात नाही. म्हैस व्यायल्यानंतर आठ ते दहा दिवस रेडकूला म्हशीचे दूध दिले जाते. त्यानंतर गायीचे दूध बाटलीने दिले जाते. हे दूध अधिक आरोग्यदायी व पचायला हलके असल्याने वासरे, रेडकूंचे आरोग्य चांगले राहत असल्याचा कुटुंबाचा अनुभव आहे.

अर्थ व्यवस्थापन कसे करावे ?

म्हशीच्या आरोग्याकडे जादा लक्ष दिल्याने दुधाचे प्रमाण अधिक आहे. एक म्हैस दररोज २० ते २१ लिटरपर्यंत तर गायही त्या आसपास दूध देते. दररोज साडेचारशे ते पाचशे लिटर दुधाचे संकलन होते. दूध संघाला पुरवठा करण्याच्या तुलनेत जास्त दर देणाऱ्या बर्फी व्यावसायिकाला आठ फॅटच्या दुधाचा पुरवठा होतो. या फरकाच्या रकमेतून गोठ्याचा व्यवस्थापन खर्च कमी होतो. दहा दिवसाला काही लाख रुपयांपर्यंतची रक्कम हाती येते. सत्तर टक्के खर्च वजा तीस टक्के निव्‍वळ नफा शिल्लक राहतो.

याशिवाय वर्षाला दीडशे ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. दोन हजार रुपये .प्रति ट्रॉली दराने त्याची विक्री शेतकऱ्यांना होते. त्यातून वर्षाला सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचे उत्‍पन्न मिळते. दोन स्वतंत्र व्यवसाय असूनही मोठ्या प्रमाणात जनावरे वाढविण्याचे धाडस कृष्णात यांनी केले आहे. कोणत्‍याही नोकरीपेक्षा हा व्यवसाय चिकाटीने केल्यास व्यवसाय नफ्यात येऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिले. सुरुवातीला त्यांनी संघाला दुधाचा पुरवठा केला. पण दर्जा चांगला असल्‍याने खासगी व्यावसायिकाकडून मागणी आली. इथे फायद्याचे गणित स्वीकारले. गोठ्यातील एक जनावरही कुपोषित आढळत नाही

Leave a Comment