वैद्यकीय खर्च न परवडणाऱ्या कुटुंबासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी दिला जातो. विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून विविध दुर्धर आजारावर मदत दिली जाते. यासाठीचा अर्ज कुठे मिळतो? तो कसा भरायचा? अशा विविध शंका सर्वसामान्यांच्या मनात असतात. सर्वसामान्य नागरिकांची ही शंका दूर करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षानं आता नवा आणि अत्यंत सुलभ उपक्रम जाहीर केला आहे. नव्या उपक्रमानुसार नागरिकांसाठी ही मिस्डकॉलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे-फडणवीस सरकारनं मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष अंतर्गत अर्थसहाय्य करण्यात येणाऱ्या आजारांच्या यादीत अनेक नवीन आजारांचा समावेश केला आहे.
शिंदे-फडणवीस सरकारनं राज्यातील अनेक गरजू नागरिकांना आजारपणातील अनेक दुर्धर आजारावरील उपचारासाठी मदत करण्यासाठी एक योजना सुरू केली आहे. त्यानुसार संपर्कासाठी 8650567567 हा नवा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर मिस्डकॉल देताच मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज मोबाईलवर उपब्लध करून दिला जाणार आहे. ग्रामीण भागांसह राज्यातील इतर कानाकोपऱ्यांतून या सहायता निधीसाठी इच्छुक असणाऱ्या नागरिकांना या सुविधेमुळे दिलासा मिळणार आहे. तसेच, अर्ज करण्याची किचकट प्रक्रिया अत्यंत सुलभ होणार आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी 1 लाख रुपयांपासून 30 लाख रुपयांपर्यंत असू शकतो.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवण्यासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे
- अर्ज (विहीत नमुन्यात)
- वैद्यकिय खर्चाचे अंदाजपत्रक / प्रमाणपत्र मुळप्रत डॉक्टरांच्या सही व शिक्यासह,खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.
- तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला (रु. 1.60 लाखपेक्षा कमी उत्पन्न असणे आवश्यक आहे.)
- रुग्णाचे आधारकार्ड (महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक)
- रुग्णाचे रेशनकार्ड (महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक)
- संबंधित आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे.
- रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी.
- अपघात असल्यास, FIR असणे आवश्यक आहे.
- अवयव प्रत्यारोपण असल्यास रुग्णालयाचे मान्यता प्रमाणपत्र अथवा ZTCC येथे नोंदणी केल्याची पावती जोडणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळणाऱ्या दुर्धर आजारांची नावे
1. कॉकलियर इम्प्लांट ( वय वर्ष 2 ते 6)
2. हृदय प्रत्यारोपण
3. यकृत प्रत्यारोपण
4. किडणी प्रत्यारोपण
5. बोन मॅरो प्रत्यारोपण
6. फुफ्फुस प्रत्यारोपण
7. हाताचे प्रत्यारोपण
8. हिप रिप्लेसमेंट
9. कर्करोग शस्त्रक्रिया
10. अपघात शस्त्रक्रिया
11. लहान बालकांचे शस्त्रक्रिया
12. मेंदूचे आजार
13. हृदयरोग
14. डायलिसिस
15. अपघात
16. कर्करोग (केमोथेरपी/ रेडिएशन)
17. नवजात शिशुंचे आजार
18. गुडघ्याचे प्रत्यारोपण
19. बर्न रुग्ण
20. विद्युत अपघात रुग्ण
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी तून अर्थसहाय्याची मागणी या ई-मेलव्दारे [email protected] केल्यास अर्जासह सर्व कागदपत्रे PDF स्वरुपात पाठवून त्याच्या मुळ प्रती मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे टपालाव्दारे तात्काळ पाठविण्यात यावेत. उपरोक्त तीनही योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या आणि राज्यातील या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकिय समितीमार्फत तपासून अर्थसहाय्य दिले जाते. संपर्क क्र. 022-22026948 सविस्तर माहिती व रुग्णालयाची यादी वेबसाईटवर आहे. (https//:cmrf.maharashtra.gov.in )
वरील माहितीच्या आधारे आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा अत्यंत सुलभ प्रक्रियेतून लाभ घेऊ शकता.