जनावरे सांभाळून दिवसाला लाख रुपये कमावतो हा शेतकरी |कुटुंबाच्या एकीतून दुग्ध व्यवसाय मध्ये घेतली उत्तुंग भरारी…

आज आपण दुग्ध व्यवसायात यशस्वी ठरलेल्या एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत.

मुरगुड (जि.कोल्हापूर)येथील कृष्णा मसवेकर यांनी बांधकाम व्यवसायाशी संबंधित व्यवसाय सांभाळून शंभर जनावरांची संख्या असलेला दुग्ध व्यवसाय फायदेशीर केला आहे.यामध्ये त्यांच्या कुटुंबाची एकी, सर्वांचे श्रम, चोख व्यवस्थापन यामुळे ही यश मिळविणे त्यांना शक्य झाले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड (ता. कागल) येथील शेतकरी कृष्णात मसवेकर यांची वडिलोपार्जित साडेतीन एकर शेती आहे. या त्यांच्या साडेतीन एकर शेतीमध्ये दोन एकर ऊस व उर्वरित क्षेत्रावर जनावरांसाठी गवत वर्गीय चारा पीक आहे. याशिवाय ते अन्य शेतकऱ्यांकडे दोन एकर शेती ही करारावर घेऊन त्यामध्ये ही चारा लागवड केली आहे.

दुग्ध व्यवसाय याबरोबरच मसवेकर हे बांधकाम व्यवसायही करतात. बांधकाम व्यवसायातून जे काही उत्पन्न मिळते ते दुग्ध व्यवसायाच्या विस्तारासाठी त्यांनी वापरले आहे.

त्यांनी दुग्ध व्यवसायाची सुरुवात ही 2018 मध्ये केवळ एका म्हशी पासून सुरू केली होती. एका म्हशी पासून सुरू झालेला गोठा आता 100 हून अधिक जनावरापर्यंत पोहोचला आहे. या त्यांच्या यशाचे रहस्य हे त्यांच्या कुटुंबातील एकी हे आहे.

गोठा व्यवस्थापन

मसवेकर यांनी त्यांच्या गोठ्याची रचना ही एकूण सव्वा एकर जागेत केली आहे,त्यामध्ये सात गुंठे क्षेत्रात गोठ्याचे बांधकाम आहे. मुक्त व बंदिस्त गोठा,वासरासाठी स्वतंत्र जागा तसेच शेण, चारा यांच्यासाठी वेगळी व्यवस्था केली आहे एका ओळीत १६ म्हशी अशा पाच ओळींमध्ये म्हशी बांधल्या जातात. भाकड मशीन ना मुक्त गोठ्यात ठेवले जाते. एकूण जनावरांपैकी ७५ म्हशी आहेत. एचएफ जातीच्या १० गाई व २५ वासरे आहेत. जसजसे दुग्ध व्यवसायातून फायदा होत गेला तसतसे टप्प्याटप्प्याने जनावरांची संख्या ही वाढत गेली.

कोरोना काळात आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्याने काही काळ गोठ्याचे नियोजन विस्कटले होते. पण जिद्दीच्या जोरावर पुन्हा एकदा विस्कटलेली घडी त्यांनी पूर्णपणे व्यवस्थित बसवली. हरियाणा गुजरात येथून जातिवंत मुर्रा जातीच्या म्हशी आणल्या. गोठ्यातच अधिकाधिक जनावरांची पैदास व्हावी असा प्रयत्न त्यांनी केला त्यासाठी कृत्रिम रेतन तंत्रज्ञानाचा आधार घेतला.

पहाटे लवकर गोठ्याचे कामकाज सुरू होते. सकाळच्या सत्रातील बहुतांश कामे 10 वाजेपर्यंत आटपली जातात. यामध्ये जनावरे धुणे, धारा काढणे,चारा व खाद्यांचे नियोजन करणे आदी कामांचा समावेश असतो. त्यांनी चार हातांनाही काम दिले आहे म्हणजेच त्यांच्याकडे चार कामगार कामावर आहेत. त्यांच्याबरोबर ते स्वतः कृष्णात व त्यांची पत्नी,भाऊ रंगराव व त्यांची पत्नी असे घरातील सर्व सदस्य काम करतात.

सकाळची कामे आटपून दोघे भाऊ त्यांच्या पारंपारिक बांधकाम व्यवसायासाठी निघून जातात. सायंकाळच्या सत्रात गोठा व्यवस्थापनाची जबाबदारी मजुरांसह महिला सदस्यावर असते ही कामे सायंकाळी आठ वाजेपर्यंत चालतात.

चार एकर क्षेत्रातून चारा दररोज उपलब्ध केला जातो. बाहेरून विकत चारा हा ऊस व मक्का आदींच्या स्वरूपात उपलब्ध केला जातो. मुरघास गव्हाचा कोंडा आदी स्वरूपाचा चारा वर्षाला 50 टनापर्यंत साठवून ठेवला जातो.

जनावरांना खाद्याच्या स्वरूपात सरकी पेंड, भुसा,मक्का पीठ, गोळी पेंड आधीचे मिश्रण देण्यात येते.

गाईच्या दुधाची विक्री केली जात नाही. म्हैस व्याल्यानंतर आठ ते दहा दिवस रेडकूला म्हशीचे दूध दिले जाते. त्यानंतर गाईचे दूध बाटलीने दिले जाते, याचे कारण म्हणजे हे दूध अधिक आरोग्यदायी व पचायला हलके असल्याने वासरे व रेडकुंच्या आरोग्य चांगले राहत असल्याचा कुटुंबाचा अनुभव आहे.

अर्थकारण

विशेषता म्हशीच्या आरोग्याकडे जास्त लक्ष दिल्याने म्हशीच्या दुधाचे प्रमाण अधिक आहे. एक म्हैस दररोज दहा ते पंधरा लिटर पर्यंत तर गाय ही वीस ते पंचवीस लिटरपर्यंत दूध देते. दररोज साडेचारशे ते पाचशे लिटर दुधाचे संकलन होते.

दूध संघाला पुरवठा करण्याच्या तुलनेत जास्त दर देणाऱ्या पेढे बासुंदी पनीर तयार करणार्‍या व्यवसायिकाला आठ फॅटच्या दुधाचा पुरवठा होतो. या फरकाच्या रकमेतून गोठ्याच्या व्यवस्थापनाचा खर्च कमी होतो.

दहा दिवसाला काही लाख रुपयापर्यंत रक्कम हाती येते, 70 टक्के खर्च वजा जाता 30 टक्के निव्वळ नफा शिल्लक राहतो.याशिवाय वर्षाला दीडशे ट्रॉली शेणखत उपलब्ध होते.

Leave a Comment