रक्षा खडसे: एक यशस्वी राजकीय प्रवास, सरपंच ते केंद्रीय मंत्री!

१८ व्या लोकसभेच्या निवडणुकीत एनडीए ने बहुमताचा आकडा पार केल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन झाले आहे.९ जून २०२४ रोजी भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा शपथविधी समारंभ पार पडला.नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात एकूण ७१ खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या रक्षा खडसे यांच्याकडे मोदी सरकारमधील सर्वात तरुण महिला मंत्री म्हणून पाहिले जात आहे.रक्षा खडसे यांच्याकडे युवक कल्याण आणि क्रीडा खात्याचा राज्यमंत्री पदाचा कार्यभार देण्यात आला आहे.

मोदींच्या नवीन मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पियुष गोयल, रामदास आठवले, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव आणि मुरलीधर मोहोळ यांचा समावेश करण्यात आला आहे.महाराष्ट्रातून रक्षा खडसे या एकमेव महिला मंत्री असतील, त्या सलग तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून आल्या आहेत.

राजकीय शुभारंभ

रक्षा खडसे या लग्नानंतरच राजकारणात आलेल्या आहेत. त्यांचे सासरे एकनाथ खडसे यांनी त्यांना राजकारणात आणले होते.मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावचे सरपंच पद हे त्यांचे पहिले राजकीय पद होते. खडसे कुटुंब ही कोथळी गावचे आहे.२०१० मध्ये त्या कोथळी गावच्या सरपंच झाल्या,तेव्हापासून त्या भाजपमध्ये सक्रिय आहेत.त्यानंतर २०१०-२०१२ या काळात त्या जळगाव जिल्हा परिषदेच्या सदस्या होत्या आणि या काळात त्या जिल्हा परिषद अध्यक्षा देखील होत्या.

२०१४ मध्ये त्यांना जळगाव मधील रावेर लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच भाजपकडून तिकीट मिळाले.रक्षा खडसे पहिल्यांदा खासदार झाल्या तेव्हा त्या अवघ्या २६ वर्षांच्या होत्या.२०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार मनीष जैन यांचा सुमारे ३.५ लाख मतांनी पराभव केला, त्याचबरोबर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी काँग्रेसचे उमेदवार उल्हास पाटील यांचा ३.२५ लाख मतांनी पराभव केला.

लोकसभा निवडणुकीत गुर्जर पाटील-लेवा पाटील फॅक्टर

उत्तर महाराष्ट्रात भाजपने राखलेल्या दोन जागांपैकी रावेर ही एक महत्त्वाची जागा आहे.रावेर मतदारसंघात लेवा-पाटील आणि गुर्जर-पाटील या दोन जातीचे मोठ्या प्रमाणावर प्राबल्य आहे.रक्षा खडसे या स्वतः गुर्जर समाजातील आहेत तर त्यांचे सासरे एकनाथ खडसे लेवा-पाटील समाजातील आहे.

रक्षा खडसेंच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) त्यांच्या वहिनी म्हणजेच एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांना तिकीट देणार असल्याची चर्चा होती,पण अखेर राष्ट्रवादीकडून (शरद पवार गट) मराठा समाजाचे श्रीराम पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली.एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार गट) राजीनामा देऊन आपल्या सुनेच्या प्रचाराची जबाबदारी स्वीकारली तेव्हा त्यांना लेवा-पाटील व  गुर्जर-पाटील या दोन्ही जातींची एकत्रित मते मिळाली असतील असे त्यांच्या या मताधिक्यावरून समजते.

एकनाथ खडसेंचा भाजपमध्ये परतीचा मार्ग

पण रक्षा खडसे यांना २०२४ चे तिकीट मिळणे सोपे नव्हते. २०२० मध्ये एकनाथ खडसे यांनी त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, मात्र रक्षा खडसे या भाजपमध्येच राहिल्या.मात्र, रक्षा खडसे यांच्या उमेदवारीबाबत अंतर्गत विरोध विरोध असल्याचे जळगाव मधील जाणकारांचे म्हणणे होते.

गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस हे सुरुवातीपासूनच रक्षा खडसेंच्या उमेदवारीच्या विरोधात होते. गिरीश महाजन यांनाही उमेदवार कोण असेल हे निश्चितपणे सांगता येत नव्हते. पण कदाचित रक्षा खडसे यांना त्यांच्या निष्ठेचा फायदा झाला. त्यांचे सासरे आणि मेहुणे इतर पक्षात सामील झाले असले तरी त्या भाजपमध्ये राहिल्या आणि मतदारसंघात चांगले काम केले.

निवडणुकीपूर्वी एकनाथ खडसे यांनी आपल्याच सुनेच्या विरोधात संभाव्य उमेदवारी नाकारल्याची चर्चा रावेर मतदारसंघात सुरू होती, एवढेच नाही तर रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा राजीनामा देऊन आपल्या सुनेचा प्रचार केला. व त्यांना भरघोस मतांनी निवडून आणण्यामध्ये त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झालेल्या रक्षा खडसे या महाराष्ट्रातील खान्देश भागातील पहिल्या महिला मंत्री आहेत.

एकनाथ खडसेंच्या राजकीय वारसदार

एकनाथ खडसे यांची राजकीय उत्तराधिकारी म्हणून रक्षा खडसे यांच्याकडे प्रामुख्याने पाहिले जात आहे. एकनाथ खडसे यांचा मुलगा आणि रक्षा खडसे यांचे पती निखिल यांचे २०१२ मध्ये निधन झाले. एकनाथ खडसे यांच्या मुली उशिरा राजकारणात आल्या. मात्र एकनाथ खडसे यांच्यासोबत रक्षा खडसे २२-२३ वर्षांच्या वयापासून राजकारणात सक्रिय आहेत.

आता त्यांच्याकडे केंद्रीय राजकारणाचा अनुभव आहे, म्हणूनच त्यांच्याकडे एकनाथ खडसेंचे राजकीय उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात आहे.

खाजगी जीवन

रक्षा खडसे या नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील खेडदिगर गावातील शेतकरी कुटुंबातील आहेत. त्या  गुर्जर-पाटील समाजातील आहे.त्यांचा विवाह एकनाथ खडसे यांचा मुलगा निखिल यांच्याशी झाला होता. निखिल खडसे यांचे २०१२ मध्ये निधन झाले.रक्षा खडसे यांना कृशिका आणि गुरुनाथ ही दोन मुले आहेत. रक्षा खडसेंच्या रुपाने खान्देश म्हणजेच उत्तर महाराष्ट्राला तिसऱ्यांदा केंद्रात मंत्रीपद मिळाले आहे.

यापूर्वी काँग्रेस खासदार विजय नवल यांच्याकडे केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाची जबाबदारी आली होती.त्यानंतर १९९९ मध्ये एरंडोलचे तत्कालीन आमदार एम.के.पाटील यांना अटलबिहारी सरकारमध्ये राज्यमंत्रीपद मिळाले.नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाच्या मागील दोन टर्ममध्ये धुळ्यातून निवडून आलेले सुभाष भामरे यांना राज्यमंत्रीपद मिळाले आहे.

Leave a Comment